
संसदेतील मागणीचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पुनरुच्चार
पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला.
महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त फुले याना अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, समाजातील पददलित आणि गोरगरीब वर्गासाठी आणि त्याहून मोठे कार्य म्हणजे स्त्री शिक्षणासाठी फुले दांपत्याने केलेले कार्य लाख मोलाचे आहे. या दोघांचेच हे श्रेय आहे, की आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उभ्या आहेत.
अशा या क्रांतिकारी दांपत्याला देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळायलाच हवा. त्यासाठी संसदेतही हा मुद्दा आपण उपस्थित केला होता, असे सुळे यांनी सांगितले. फुले दांपत्याला भारतरत्न मिळावा यासाठी देशातील सर्व राजकीय नेते, मंत्री, आणि कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांनी पक्षभेद आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आज महात्मा फुले जयंतीदिनी पुन्हा एकदा आपण याबाबत सर्वांना आवाहन करट असून या मागणीला सर्व पक्ष आणि संघटना पाठिंबा दर्शवतील अशी आशा आहे, अशी अपेक्षात्यांनी यावेळी व्यक्त केली.