दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको, ‘मरे’ची वाहतूक खोळंबली

देश लोकसभा मतदार संघ

रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले

मुंबई | Updated: March 20, 2018 10:01 AM

दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले आहेत. पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना रेल्वे रुळावरुन हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडून रुळावरुन हटण्यास नकार दिला.

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

रेल रोकोचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन हटण्यास नकार दिला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले.

सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी आहेत. आधी रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मध्य रेल्वेकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शेवटी अनेकांनी रुळांवरुन चालतच रेल्वे स्थानक गाठले. या रेल रोकोचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे. काही विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेनवरुन दगडफेकही केली. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यात काही विद्यार्थी जखमी झाले.

https://www.loksatta.com/mumbai-news/central-railway-train-service-affected-rail-roko-between-dadar-and-matunga-1648431/