
धनकवडी भागात असलेल्या लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन याठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
सुळे यांच्या संकल्पनेतून आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी संविधान स्तंभ बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत बारामती, सासवड, जेजुरी, मुळशी आणि अन्य ठिकाणी हे स्तंभ उभे करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनकवडी भागातही स्तंभ उभारण्यात आला आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला.
देशाचे संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांना मूठभर लोकांच्या हातात पुन्हा सत्ता आणण्याचा उद्देश आहे, मात्र देशातील लोक आता तसे होऊ देणार नाही, असा विश्वास पवार यांनी या वेळी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की काही महिन्यांपूर्वी संविधान जाळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला ज्याचा राष्ट्रवादी ने निषेध केला होता. राष्ट्रवादी हा पहिला पक्ष आहे ज्याने संविधान बचाव हे आंदोलन हाती घेतले.त्याअंतर्गत विविध ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्यात आले आहेत. मी, अजित पवार आणि शरद पवार हे देवाची शपथ न घेता संविधानाची शपथ घेतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
संविधान जाळल्याची घटना ज्यांनी केली त्यांना अजूनही अटक नाही, त्यांच्यावर खरेतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी सुभाष वारे यांनी केली.
http://www.sarkarnama.in/discussion-drought-or-height-statue-sharad-pawar-31072