
पुणे-मुंबई रस्त्यालगत मुळा नदीकाठी (वाकडेवाडी परिसर) येथील माधवराव शिंदे उद्यानालगत गदिमांचे स्मारक उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत याठिकाणी केवळ सीमाभिंत उभारली गेली आहे. स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. या पार्श्वभूमीवर गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. खडकवासल्यातील रखडलेल्या कामांसह विविध प्रश्नांसदर्भात सुळे यांनी राव यांची भेट घेतली.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, श्रीधर माडगूळकर, सुमित्र माडगूळकर, आलोक आंबेकर या वेळी उपस्थित होते. तेव्हा, गदिमांच्या स्मारकाचा मुद्दा मांडून ते का रखडले, याची विचारणा करण्यात आली. त्यातील अडचणी दूर करून तेथे प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली. गदिमांच्या स्मारकासाठी निधी देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून सुळे या करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्याच्या भिंतीला तडा गेल्याने वाड्याला धोका निर्माण झाला असल्याने त्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही सुळे यांनी चर्चा केली.
महापालिकेत नव्याने आलेल्या गावांमधील रहिवाशांना अजूनही सेवा-सुविधा मिळत नाहीत. प्रामुख्याने रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य आदी सुविधा पुरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून पावले उचलावीत.
सुप्रिया सुळे, खासदार
http://www.esakal.com/pune/complete-memorial-g-d-madgulkar-immediately-123105