राम कदम मुलींना पळविण्याची भाषा करतात तरी मुख्यमंत्री गप्प कसे ? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्र
सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद: भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याची भाषा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही तरी बोलाव ही अपेक्षा होती. पण ते बोलले नाही, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकाराचा निषेध करायला हवा होता ?अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. 

संविधान बचाव, देश बचाव मेळाव्यात सुळे बोलत होत्या. भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे त्याठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली.

संविधान जाळण्याचा प्रयत्न जेव्हा दिल्लीत झाला, तेव्हा संविधान बचावसाठी सर्वात आधी राष्ट्रवादीने आंदोलन केले आणि त्यानंतर देशभरात सुरू झाले याची आठवण करून देतांनाच महिलांची सुरक्षितता गंभीर बाब असून सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदारांनी यापुढे महिलांच्या बाबतीत चुकीची, अपमान करणारी वक्तव्य केली तर राष्ट्रवादी ते कदापी सहन करणार नाही असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला.

तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का?

सुप्रिया सुळे यांच्याआधी धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. आपल्या तडाखेबंद भाषणाचा शेवट मुंडे यांनी हिंदी शायरीने केला. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या अस्सलिखित हिंदींचे कौतुक करतांनाच तुम्हाला लोकसभा लढवायची आहे का? असा चिमटा देखील काढला.

धनंजय मुंडे एवढ चांगले हिंदी बोलतात, यावरून ते लोकसभेची तयारी तर करत नाही ना? असे मला वाटले. पण ते औरंगाबादेत बोलत आहेत, आणि हा त्यांचा मतदारसंघ नाही असे म्हणत त्यांनी मुंडे यांची फिरकी घेतली.

http://www.sarkarnama.in/supriya-sule-attack-cm-29513