
लामजेवाडी (ता. इंदापूर) येथे सुप्रिया सुळे यांनी आज भेट दिली, त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘केंद्र व राज्यातील सरकार महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रधानमंत्री छोट्या-छोट्या गोष्टीवर लगेच बोलतात; परंतु जम्मूची घटना व उत्तर प्रदेशातील घटनांवर बोलायला त्यांनी खूप वेळ लावला. केंद्र व राज्यातील सरकार महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अपयशी ठरल्याने महिला घराबाहेर पडल्यावर ती घरी येईपर्यंत घरच्यांना व पालकांना चिंता लागून राहत आहे.’’
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘‘राष्ट्रवादीने २०१९ च्या निवडणुकांची तयारी करू नये, तर २०२४ ची तयारी करावी. कारण सरकार भाजपचे येणार आहे,’’ असे सांगितले. याबाबत सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘सध्या त्यांच्याकडे खाते असलेल्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यात गोरगरीब जनतेचा विनाकारण जीव जात आहे.
त्यामुळे बांधकाममंत्र्यांनी आधी या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व त्यांची संख्या शून्यावर आणावी, मगच निवडणुकीविषयी बोलावे. परंतु, भाजपच्या नेत्यांना लोकांची कामे करण्यात रस नसून, केवळ निवडणुकांत रस आहे. हा रस कमी करून कामाच्या केवळ घोषणा करण्याऐवजी गोरगरीब जनतेची कामे करावीत व महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, याचा विचार करावा.’’
‘आर. आर. आबांना श्रेय’
‘‘मुख्यमंत्र्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली; परंतु आपण जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असला, तरी याचे संपूर्ण श्रेय माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनाच जाते. कारण, मागील २० वर्षांपूर्वी देशात व राज्यात स्वच्छतेविषयी कोणी बोलत नव्हते, तेव्हा आर. आर. आबांनी स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी स्वच्छतेसंबंधी योजना आणल्या व यशस्वी केल्या. त्यातून गावे निर्मल झाली. त्यामुळेच महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला, याची घोषणा आपणाला करता आली. त्यामुळे त्याचे संपूर्ण श्रेय आर. आर. आबांना जाते,’’ असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
http://www.esakal.com/maharashtra/girl-women-unsecure-state-supriya-sule-111027