भाणगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना धक्कादायक आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे : एकीकडे जातीअंतासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे जाती-जातींतील दऱ्या वाढत आहेत. त्यातूनच अशा घटना घडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा धाक अबाधित राखण्यात या सरकारला आलेले अपयश हेच आहे, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भाणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.