आम्हाला न्याय द्या

पुणे शहर महाराष्ट्र
सकाळ वृत्तसेवा
01.38 AM

हिंजवडी – हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांत्वन केले. या घटनेतील आरोपींनी लवकर कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी सुळे यांच्याकडे केली. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश पाडाळे, अमित कंधारे, हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, कासारसाईचे सरपंच युवराज कलाटे आदी उपस्थित होते.

पीडितेच्या नातेवाइकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नसून, या घटनेत जुजबी कलम लावल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी सुळे यांना दिली असता त्यांनी हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याशी संपर्क साधून गुन्ह्याची गंभीरता व नोंदवलेल्या गुन्ह्याची माहिती घेतली.

या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असून अटकेत असलेला आरोपी गणेश निकम (वय २२) याच्यावर कलम ३७६ एबी, ३७६ डीबी, ३७७, पाक्‍सो ५ एम (सामूहिक बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार कलमे लावल्याचे गवारे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आवश्‍यक ते पुरावे व जवाब नोंदविण्याचे काम पोलिस करत आहे.’’

कायदा जनजागृतीची गरज
अशा घटनांबाबत मीडिया, सोशल मीडियामध्ये चर्चा होत असताना लोकांना कायद्याची भीती का वाटत नाही. एका चुकीमुळे संपूर्ण जीवन उदध्वस्त होते. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. सरकारनेही लैंगिक शिक्षणापेक्षा अशा घटनांचे दुष्परिणाम व कायद्याची भीती निर्माण होईल असा अभ्यासक्रम आणणे काळाची गरज आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

http://www.esakal.com/pune/give-us-justice-victims-family-members-demand-145245