कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली.

बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान  होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ नाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावायला एवढा उशीर का केला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

महाराष्ट्र विधानसभेत पडसाद

दरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत.

काल इतर विषय बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र त्याला विधानसभाध्यक्षांनी नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केला आहे.

कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार

13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.