
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या बांधकाम खात्याला लक्ष्य केले असून, सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुरू केले आहे. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सरकारने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रोज नवनव्या डेडलाईन देत ‘तारीख पे तारीख’ हा खेळ सुरु ठेवला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्यभर मोहीम त्यांनी सुरु केली आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
“राज्य प्रगतीच्या मार्गावरुन चालत असल्याच्या प्रचार सरकार एकीकडे करीत आहे. दुसरीकडे परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत आहे. प्रगतीचा मार्ग तर सोडाच परंतु ज्या रस्त्यावरुन राज्यातील जनता रोज ये-जा करते ते रस्ते देखील धड नाहीत. ज्या शहरांना स्मार्ट करण्याचे ढोल या सरकारने पिटले त्या शहरांमध्येही हिच स्थिती आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील रस्त्यांची स्थिती विदारक आहे. याखेरीज राज्यांतील इतर शहरांना जोडणाऱ्या तसेच खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही दारुण अवस्था झाली आहे,“ असा आरोप त्यांनी केला.
“या रस्त्यांची डागड्डुजी व्हावी, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आपण सर्वांनी या पूर्वी ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन पुकारत यापूर्वीही सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता.आता परत तुम्ही तुमच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत फोटो काढून तो फेसबुक, ट्विटर या सोशल मिडियावर अपलोड करायचा आहे. या फोटोसोबत #SelfieWithPotholes हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन सुळे यांनी केले आहे.
http://www.sarkarnama.in/mp-supriya-sule-selfie-potholes-27988