संभाजी भिडे यांच्या वक्‍तव्यातून महिलाद्वेष – खासदार सुळे

पुणे शहर
गावांच्या विकासासाठी आयुक्‍तांची भेट – पंकजा मुंडे यांच्यावरही टीकास्त्र

NewsNoImage

पुणे – “शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून, भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयी द्वेष दिसून येतो असे मत सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.

यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, सचिन दोडके, योगेश ससाणे आदी नगरसेवक उपस्थित होते.बारामती मतदार संघात येणाऱ्या पुणे महापालिका हद्दीतील गावांतील प्रश्‍नांसंदर्भात सुळे यांनी आयुक्त सौरभ राव यांची सोमवारी भेट घेतली त्यांनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

प्रत्येक महिलेला आई असण्याचा अभिमान असतो; मला देखील तो आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेले विधान हे निषेधार्थ असून त्यांच्या या बेताल वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयक द्वेष दिसून येतो, अशी टीका सुळे यांनी केली. राष्ट्रवादीचे हे आंदोलन “हल्लाबोल’ नसून “डल्ला मारो’ आहे असे विधान महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी आहे. भाजपला “हल्लाबोल’आंदोलनाचा त्रास होत असल्यानेच अशाप्रकारचे विधान त्यांच्याकडून केले जात आहे

आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेबद्दल सुळे म्हणाल्या, “समाविष्ट 11 गावांमध्ये रस्ते पाणी आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. गावे समाविष्ट होऊन आठ महिने झाले, तरी महापालिका काहीच करत नाही असेच चित्र आहे. या गावांच्या विकासाबाबत आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. कवी ग. दि. माडगुळकर यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल, असे त्यांचे स्मारक येथे व्हायला हवे. परंतु तसे होत नाही हे खेदजनक आहे, अशी टीका सुळे यांनी केली. आयुक्तांना याविषयीही सांगितल्याचे त्या म्हणाल्या.

म्हणून शरद पवारांना लक्ष केले जाते
बोलण्याचा आणि टीका करण्याचा आधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, व्यक्‍तिगत टीका करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून काही लोक शरद पवार यांना लक्ष करतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

पंतप्रधानांना पत्र लिहणार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. या परीक्षेमुळे गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम अधिकारी देशाला लाभतात. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मी निषेध करत आहे. या परीक्षेचे महत्त्व कमी करू नये, यासाठी लवकरच आपण पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D/