राज्याचे शिक्षण क्षेत्र सोळाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमाकांवर पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच जाहीर केले.
लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 28, 2018 7:29 PM

राज्याचे शिक्षण क्षेत्र सोळाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमाकांवर पोहोचले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे नुकतेच जाहीर केले. त्यांनी हे विधान कोणत्या आधारावर केले त्यासाठी कोणते सर्वेक्षण केले याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुण्यात केली. तसेच राज्याचा शिक्षण विभाग विनोदाच्या तावडीत सापडल्याची टीका करीत शिक्षणमंत्री तावडे यांनाच सध्या माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे शिकवणीची गरज असल्याचा टोला लगावला
सुळे म्हणाल्या, शाळा बंद करण्याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे खोटे बोलत आहेत, असे विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. हे ऐकून अत्यंत दुःख वाटत असून आतापर्यँत राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर शरद पवार आणि मी कधीही खोटे बोललेलो नाही. राज्यातील शिक्षण क्षेत्राची अवस्था भाजप सरकारने भीषण करून ठेवली आहे. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी कोणत्याही सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, हे सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे शाळा बंद करण्याच्या निर्णयातून स्पष्ट होत आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली.
त्या पुढे म्हणाल्या, आम्ही सत्तेत असताना शिक्षणात कधीही राजकारण आणले नाही. मात्र, हे सरकार शिक्षणात राजकारण आणत असून सरकारच्या निर्णयातून हे स्पष्ट होत आहे. या राजकारणामुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या मुलांचा बळी जात आहे. या सर्व निर्णयाचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.