सातारा : ”कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसताना केवळ सुप्रिया सुळे यांनी माझे संघटनकौशल्य पाहून मला युवती सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले, तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन आणले,” अशा शब्दांत राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सक्षणा सलगर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेली दोन दिवस त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी युवतींचे मेळावे घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. आज त्या साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आल्या. येथे त्यांचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. यावेळी युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्र जाधव उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, महिला व मुली सुरक्षित नाहीत, भाजप सरकारने त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाहीत. मोफत पासही मिळालेले नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या कारभाराबाबत सर्वजण नाखुश आहेत. सरकारमधील मंत्री व नेते महिला व मुलींबाबत विकृत वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे बेटी बचाओ ऐवजी बेटी भगाओ असाच यांचा नारा दिसत आहे.
भाजपचे मंत्री व नेते महिला व मुलींबाबत सातत्याने विकृत विधाने करत आहेत. मंत्रीमंडळात भाजपची ही अभद्र टीम भरलेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सॅनिटरी नॅपकिनवरून केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
-सक्षणा सलगर