
पुणे, दि. १७ (प्रतिनिधी) – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील अंगणवाडी आणि आशा सेविका काम करत असून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. त्यांना हेल्थ कार्ड देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यातील बालकांच्या आरोग्यासाठी सतत झटणाऱ्या या महिलांचे स्वत:चे आरोग्य सांभाळण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मुळातच कमी पगार, त्यात घरगुती प्रश्न, आणि अन्य अनेक कारणांनी या महिलांच्या आरोग्याची हेळसांड होते. शेकडो महिला अक्षरशः उपाशी पोटी तासनतास काम करत असतात. साहजिकच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या महिलांमध्ये अनेकदा अशक्तपणा, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, गर्भाशय आणि स्तनाचा कर्करोग अशा आरोग्याच्या गंभीर समस्या आढळून आल्या आहेत. त्यांना स्वस्त दरात चांगले उपचार मिळावेत. यासाठी लवकरात लवकर राज्यातील सर्व अंगणवाडी आणि आशा सेविकांना हेल्थ कार्ड मिळावे, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
या सेविकांना देण्यात येणाऱ्या हेल्थ कार्डवर हिमोग्लोबिन, ब्रेस्ट व गर्भाशयाचा कॅन्सर तपासणी करण्याबरोबरच मोफत उपचाराचीही तरतुद करण्यात यावी, त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असेही सुळे यांनी म्हटले आहे.