
लग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मिता आणि आनंद यांच्या लग्नाची बोलणीही अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानातच झाली होती. तेव्हाच, ‘मला मुलगी नसल्याने स्मिता ही माझ्यासाठी मुलीसारखी आहे,’ असे सांगून त्यांनी या विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. हो सोहळा थाटात व्हाव यासाठी अजितदादाच थोरात कुटुंबियांशी बोलत होते. लग्न जवळ आल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दादा अक्षरशः लगीनघाईत होते. या काळात ते रोज पाटील आणि थोरात कुटुंबियांशी बोलून तयारीचा आढावा घेत होते. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही पदाधिकाऱ्यांना स्मिता यांच्या लग्नाचे निमंत्रण देत, लग्नाला आवर्जजून येण्याचा आग्रह त्यांनी केला होता.
लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे, सोमवारीही दादांनी स्मिता, आनंद यांच्याशी बोलून काही राहिले नाही? याची विचारपूस केली. पवार कुटुंबातील बहुतांश मंडळी आज विवाह सोहळ्याच्या गडबडीत होती. सायंकाळी लग्न असल्याने दादा दुपारी चार वाजताच मांडवात आले. काही मिनिटे थांबून पाहुणे मंडळीशी चर्चा केली. त्यानंतर परिसरातील विवाहसोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी दादा बाहेर पडले. ते आटोपून पुन्हा पाच वाजता लक्ष्मी लॉनमध्ये आले. आल्याबरोबर दादा थांबले ते लक्ष्मी लाॅनच्या गेटवर. विवाहासाठी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी!
http://www.esakal.com/pune/ajit-pawar-supriya-sule-attend-rr-patil-daughter-wedding-pune-113412