Image Not Found

पवारांकडून दादांची पाठराखण तर ताईंचं कौतुक

महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी अधिवेशनाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. यावेळी पवार कुटुंबियांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला.

कार्यकर्त्यांना यावेळी संबोधताना शरद पवार यांनी सिंचनप्रश्नी अजितदादांची पाठराखण करत सुप्रिया सुळेंच्या युवती मेळाव्यातील कामाचं कौतुक केलं. धरणांच्या निकृष्ट कामांसाठी नेते नव्हे तर अभियंते किंवा कंत्राटदार जबाबदार असतात, असं सांगत पवारांनी अजितदादांना क्लीन चिट दिली. तर युवती मेळाव्यामुळे राज्यात नवं नेतृत्त्व तयार होत असल्याचं पवारांनी सांगितलं.

दरम्यान यावेळी शरद पवारांनी लवासाप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंह यांच्या आरोपांना पुन्हा उत्तर दिलं. लवासामुळे परिसरातील हजारो लोकांना रोजगार मिळून त्यांचा फायदाच झाला. तसंच लवासामुळे भागातील पडीक जमिनीचा योग्य वापरझाल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

यावेळी राज्यातील पाणीप्रश्नालाही शरद पवारांनी हात घातला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यात सुरु असलेल्या पाणीप्रश्नाचं वास्तव लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचंही पवार सांगितलं.

अधिवेशनातील भाषणात संबोधताना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विकासावर आधारित राजकारण करा आणि टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.