मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा : शरद पवार

पुणे शहर
Published On: Nov 27 2018 1:23AM | Last Updated: Nov 27 2018 1:12AM
मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी राम मंदिर

पुणे : प्रतिनिधी _

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. जनावरांसाठी चारा-पाणी नाही. लोकांच्या हाताला काम नाही. देशातही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, असे असताना मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा समोर आणला जात आहे, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे.

देशातील सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले संविधान दिनाचे औचित्य साधून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धनकवडी येथे साकारलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ सोमवारी शरद पवार यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड. जयदेवराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष चेतन तुपे, स्थानिक नगरसेवक व संयोजक विशाल तांबे,  प्रा. सुभाष वारे, डॉ. अशोक शिलवंत, डॉ. प्रशांत पगारे आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशातील विविध जाती- धर्मांच्या लोकांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने केले आहे. खा. सुळे म्हणाल्या,  संविधानासंबंधी जनतेमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या हेतूने संविधान स्तंभ उभारण्यात आला असून देशातील इतर राज्यातील खासदारही याचे अनुकरण करणार आहेत.

प्रा. सुभाष वारे म्हणाले, ज्यांनी संविधान जाळले त्यांना मोकाट सोडून त्याविरोधात आंदोलन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे.

पंपावर पेट्रोलचे दर आठवतात की, राम मंदिर

शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश होणे गरजेचे आहे. आज राज्यकर्त्यांकडून संविधान बदलण्याची भाषा केली जाते. नागरिकांचे मन दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोलचे दर आठवतात की, राम मंदिर आठवते यावर कोणीच बोलत नाही.  – डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते

http://www.pudhari.news/news/Pune/Ram-temple-issue-to-keep-original-questions-says-Sharad-Pawar/