खासदार सुप्रिया सुळेंना ‘पार्लमेंट्रियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रन’ पुरस्कार

देश लोकसभा मतदार संघ
ताई

‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेचे वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार बारामतीतील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांनीच ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. राज्यभरातील विशेष मुले, अंगणवाड्या, शालेय शिक्षकांसाठी सुप्रिया सुळे सातत्याने कार्यरत आहेत.

कर्णबधीर मुलांना ऐकू येत नसल्यामुळे ती बोलू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सुप्रिया सुळे अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसवण्याचा कार्यक्रम घेत असतात.

सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली होती. जागतिक विक्रम झालेल्या या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल चार हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवण्यात आली. आपल्या मतदारसंघातील एकही मुलगी दूर अंतरामुळे शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्या दरवर्षी सुप्रिया सुळे विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करतात. गेल्या वर्षी 15 हजार, तर यावर्षी दहा हजारांहून अधिक सायकलींचे वाटप करण्यात आले.

अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांना पाणी, वीज, पोषण आहार आणि इतर कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी त्या सतत कार्यशील आहेत. या सर्व कामांची दखल घेत ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रियन अॅवॉर्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला.

http://aplapune.com/article/ncp-mp-supriya-sule-received-parliamentarians-award-for-children-given-by-parliamentarians-group-for