पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू करावे- खासदार सुप्रिया सुळे

पुरंदर पुरंदर विधानसभा महाराष्ट्र लोकसभा मतदार संघ


नवी दिल्ली येथे पार पडली बैठक

पुरंदर विमानतळ लवकर करावा

पुणे- पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. याबरोबर तेथील पाणी प्रश्‍न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

पुरंदर येथे होत असलेल्या विमानतळासंदर्भात दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.

या विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रमात आहेत. त्यामुळे अलिकडेच या शेतकऱ्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. या मोर्चातील संख्या लक्षणीय होती. हे पाहता त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढला गेला पाहिजे. त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना भेटून चर्चा झाली पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांवर योग्य तो तोडगा काढून आवश्‍यक मोबदला मिळेल याची ग्वाही द्यावी लागेल. त्यांतर आवश्‍यक ते भूसंपादन करून, पाणी आणि अन्य प्रश्न लवकरात लवकर सोडवून विमानतळाचे काम तातडीने सुरु व्हावे, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी या बैठकीत व्यक्त केली.

विमानतळाला जोडरस्ते
या बैठकीत विमानतळाच्या प्रस्तावित जागेसाठी सध्या अस्तित्वात असणारे जोडरस्ते, प्रस्तावित रिंग रोड तसेच रेल्वे आणि मेट्रो ह्यांची विमानतळास जोडणी इत्यादी विषयांवर चर्चा झाल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.

पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू करावे