श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रम

पुणे शहर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्रे बसविण्यात आली. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत हा विक्रम रचला गेला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, स्टार्की हीअरिंग फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप आणि आर. व्ही. एस. एज्युकेशन अँड चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यापूर्वी आठ तासांच्याच कालावधीत एनआरएचएम आणि मणिपूर सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात तीन हजार ९११ श्रवणयंत्रे जोडण्यांचा विक्रम करण्यात आला होता. खासदार शरद पवार, आमदार अजित पवार, स्टार्की हीअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन, टीम ऑस्टिन, रोहित मिश्रा, सुरेश पिल्लई, आर. वेंकटरमण, कल्याणी मांडके, नंदकुमार फुले, महेश जोशी, रमेश थोरात, विठ्ठल कामत, प्रभाकर देशमुख, रवी शास्त्री, विजय कान्हेकर, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, नीलेश राऊत आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, ‘एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने श्रवणयंत्रे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याची जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. जागतिक दर्जाचा उपक्रम पार पडला याचा आनंद वाटतो.’

‘गेल्या पाच वर्षांपासून राज्यात विविध भागांत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. २०१३ पासून सुमारे १५ हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या वेळी त्याची व्याप्ती वाढविण्यात आली असून, एकाच दिवशी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सहा हजार जणांना वाटप करण्याचे ठरविण्यात आले,’ असे सुळे यांनी सांगितले.

……………

मुलांनी प्रथमच ऐकल्या ध्वनिलहरी

या उपक्रमाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुरुवात करण्यात आली. शिवछत्रपती क्रीडासंकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे तब्बल सहा संचामध्ये या जोडण्या करण्यात येत होत्या. तपासणी, जोडणी आणि समुपदेशन आदीच्या सहा संचात या जोडण्या करण्यात आल्या. त्यामुळे आयुष्यात प्रथमच ध्वनिलहरी कानावर पडल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा ऐकायला येऊ लागल्याने आनंदाश्रू अनावर झाले होते. काही पालकांनी आपली मुले आता ऐकू आणि बोलू लागतील, याचे समाधान बोलून दाखवत होते.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/the-record-of-hearing-aids/articleshow/66383452.cms?utm_source=mt&utm_medium=Whatsapp&utm_campaign=onpagesharing