धनकवडी येथे खाद्य महोत्सवाचे उद्घाटन

पुणे शहर
खाद्यमहोत्सव

पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला खाद्य महोत्सव आजपासून धनकवडी येथे सुरू झाला. धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय केंद्र येथे रविवार पर्यंत हा महोत्सव चालू राहणार आहे.
ग्रामीण भागातील गरजू आणि कष्टकरी वर्गातील महिलांना रोजगार मिळावा, तसेच त्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांना योग्य ती बाजारपेठ मिळावी म्हणून सुळे यांनी याच महिलांच्या बचत गटाद्वारे विविध ठिकाणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. ही संकल्पना पुण्यात आता चांगलीच रुजत असून आज धनकवडी येथे सुरू झालेल्या या महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापूर्वी वारजे, सिंहगड रस्ता परिसर आणि कात्रज भागात हे महोत्सव झाले आहेत.
धनकवडी येथील खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुळे यांच्या भगिनी रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक विशाल तांबे, किशोर धनकवडे यांच्यासह अश्विनी भागवत, नरेंद्र पवार, विजया ठाकरे, आदी याप्रसंगी उपस्थित होते. या महोत्सवात नेहमीप्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात आंबेगाव बुद्रुक येथील तेजल मरगजे यांनी पैठणी जिंकली असून ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.