तावडेंचे आरोप खोटे; बंद शाळांची दिली याद, शिक्षण खात्यात विनोदी कारभार

महाराष्ट्र

May 29, 2018

सामना प्रतिनिधी । पुणे

शिक्षण खात्यात विनोदी कारभार

राज्यात तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे चुकीचे राजकीय वक्तव्य करीत असून, त्यांच्या अपप्रचारामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आरोपाला खासदार सुळे यांनी बंद पडलेल्या शाळांची यादी दाखवून प्रत्युत्तर दिले. तावडेंचा आरोप म्हणजे स्वत:चे अपयश लपविण्यासाठी केलेली केवलवाणी धडपड आहे. गेली तीन-चार वर्षे शिक्षण खात्यात ‘विनोदी’ कारभार सुरू असून, त्याला आवर घालण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शिक्षणमंत्री तावडे यांनी ‘शाळा बंद’ निर्णयाच्या संदर्भात पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कोल्हापुरात पवार आणि सुळे यांच्यावर आरोप केले होते. त्याला सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर दिले. पुणे जिल्ह्यातील तीन कि. मी. अंतराच्या आतील बारामतीमधील गारमाळ ही दीड कि. मी. आणि शिरूरमधील २.९ कि. मी. अंतर असणारी भिलवस्ती या शाळा बंद केल्या. जिल्ह्यात १९ शाळा बंद झाल्या. असे असताना आम्ही खोटं बोलतो, असा आरोप तावडे करतात कसा? असा सवाल सुळे यांनी केला. यावेळी माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे, जि. प. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, वैशाली नागवडे हे उपस्थित होते. बंद शाळेतील मुलांची कोणतीही व्यवस्था सरकारने केली नाही. असे असताना आमच्यावर खोटे आरोप शिक्षणमंत्र्यांनी करावेत, हे दुर्दैव आहे.

सर्वेक्षण बंद, मग ३ रा क्रमांक कसा?
राज्याचा शिक्षणाचा दर्जा १६व्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तो कोणत्या निकषाच्या आधारे केला? असा सवाल खासदार सुळे यांनी केला. ‘प्रथम’ने रँकिंग बंद केले आहे. ‘असर’चा अहवालही पाच वर्षांत आला नाही, मग मुख्यमंत्री कशाच्या आधारे दर्जा आणि क्रमांक ठरवत आहेत, ते जाहीर करावे.

मला बारामतीची ट्युशन नको – तावडे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसला ट्युशनची गरज आहे. शाळा बंद धोरणावर त्यांनी माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावावी, अशी खोचक टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना तावडे म्हणाले, बारामतीच्या ट्युशनमध्ये धरणातल्या भ्रष्टाचाराने पाणी कसे आणायचे ते दादा आणि ताई शिकवतात. मला पवार स्कूल नको. एसएससी बोर्ड चांगले आहे. त्यामध्ये प्रामाणिकपणा शिकवितात, असे सांगितले.

http://www.saamana.com/supriya-sules-remarks-on-vinod-tawde-and-education-department/