प्रतिनिधी | May 29, 2018, 03:08 AM IST

पुणे – गुणवत्ता आणि दर्जा यांचे खालावलेले स्वरूप आणि कमी पटसंख्येची कारणे देत राज्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे ‘शाळाबंदीचा डाव’ रचत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. शाळा समायोजित करण्याचे कारण दाखवून सरकार राज्यभरातील शाळा बंद करण्याचा डाव रचत आहे. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांचे उघड नुकसान असून, शिक्षणहक्क कायद्यााचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. शिक्षण खात्यात असे अनेक ‘विचित्र विनोद’ सुरू आहेत, असेही सुळे उपरोधिकपणे म्हणाल्या.
शाळा बंद धोरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे धादांत खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. सुळे म्हणाला, पुणे जिल्हा परिषदेच्या वित्त आणि शिक्षण सभापती विवेक वळसे, बालभारतीचे माजी संचालक डॉ. वसंत काळपांडे या वेळी उपस्थित होते. राज्यातील ५६०० शाळांत १० पटसंख्या आहे, त्यातील १३१२ शाळांच्या १ किमी परिघात दुसरी शाळा आहे, त्यापैकी ५६८ शाळा समायोजित केल्या, ५४१ शाळांसाठी वाहनव्यवस्था केली, तरच त्या समायोजित होऊ शकतात म्हणून अद्याप त्यांचे समायोजन केलेले नाही, ३८३ शाळांतील मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली होती. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.
समायोजित झालेल्या शाळांची संख्या ४३० आहे. काही शाळांचे समायोजन १ किमीपेक्षा दूर असलेल्या शाळांत करण्यात आले. शिक्षणहक्क कायद्यानुसार विद्यार्थ्याचे घर ते शाळा असे अंतर मोजण्यात येते. मात्र, समायोजनामध्ये दोन शाळांतील अंतर मोजण्यात आले आहे. शाळांच्या समायोजनामध्ये पटसंख्या, समायोजन आणि गुणवत्ता यांचे नेमके काय निकष लावण्यात आले, याविषयी संदिग्धता आहे. हे निकष स्पष्ट करावेत, अशी मागणी सुळे यांनी केली.